बातमीचा पंचनामा

सत्य बातमी. निर्भीड मांडणी.

कुंभार पिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना

• •

दम लागणे हे म्हातारपणाचे लक्षण नाही; COPDचे लवकर निदान महत्त्वाचे

COPD जनजागृतीसाठी फुफ्फुसांचे चित्र, श्वास घेण्यास त्रास होत असलेला मुलगा आणि डॉक्टर

जालना : (प्रतिनिधी) जागतिक दीर्घकालीन श्वासावरोध विकार (Chronic Obstructive Pulmonary Disease – COPD) दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त लवकर निदान व योग्य उपचार हाच निरोगी जीवनाचा मंत्र असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी सांगितले.

या दिनाची संकल्पना “Early Diagnosis and Management for a Better Life” — “लवकर निदान व व्यवस्थापन, उत्तम जीवनासाठी” अशी आहे. COPD हा सामान्य, प्रतिबंधात्मक आणि उपचारयोग्य आजार असूनही अनेक वेळा त्याचे निदान उशिरा होते किंवा चुकीचे निदान होते. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. याबाबत जनजागृती करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

COPD म्हणजे काय?

COPD हा फुफ्फुसांचा दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये श्वासनलिकांना सूज येऊन त्या अरुंद होतात व फुफ्फुसांना हानी पोहोचते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामध्ये प्रामुख्याने क्रॉनिक ब्रॉन्कायटीसचा समावेश होतो. हा आजार हळूहळू वाढत जातो व वेळीच उपचार न केल्यास गंभीर स्वरूप धारण करतो.

COPD होण्याची प्रमुख कारणे

  • धूम्रपान / तंबाखू सेवन : COPD चे सर्वात प्रमुख कारण.
  • घरातील धूर : चुलीचा धूर, लाकूड, शेण, कोळसा यांच्या ज्वलनातून होणारे प्रदूषण.
  • हवा प्रदूषण : धूळ, धूर, रासायनिक वायू व कारखान्यातील धूर.
  • श्वसनाचे संसर्ग : वारंवार होणारे श्वसनाचे संसर्ग.
  • व्यावसायिक कारणे : धूळ, कापूस, कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांचा संपर्क.

लक्षणे ओळखा

  • सतत खोकला येणे व कफ येणे.
  • चालताना किंवा जिना चढताना दम लागणे, श्वास फुलणे.
  • श्वास घेताना घरघर किंवा शिटी वाजल्यासारखा आवाज येणे.
  • छातीत घट्टपणा किंवा जडपणा जाणवणे.
  • वारंवार सर्दी, खोकला, ताप येणे.
  • थकवा येणे व काम करण्याची क्षमता कमी होणे.

“दम लागणे हे म्हातारपणाचे लक्षण नाही.” दम लागत असेल तर तात्काळ तपासणी करून घ्यावी.

निदान कसे केले जाते?

COPD च्या निदानासाठी स्पायरोमेट्री ही सोपी श्वास तपासणी केली जाते. यामध्ये श्वासाची क्षमता मोजली जाते. ही तपासणी जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध आहे. ४० वर्षांवरील व्यक्ती, धूम्रपान करणारे तसेच चुलीच्या धुरात काम करणाऱ्या महिलांनी नियमित तपासणी करून घ्यावी.

प्रतिबंध व उपचार

  • धूम्रपान व तंबाखू पूर्णपणे बंद करणे.
  • घरात धूर होणार नाही याची काळजी घेणे व स्वच्छ इंधनाचा वापर करणे.
  • धूळ, धूर व प्रदूषणापासून संरक्षणासाठी मास्कचा वापर करणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित इनहेलर व औषधोपचार घेणे.
  • दरवर्षी फ्लू व न्यूमोनिया लसीकरणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे.
  • नियमित व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम व सकस आहार घेणे.
  • उपचार अर्धवट सोडू नयेत व नियमित फॉलोअप घ्यावा.

जिल्ह्यात जनजागृतीचे उपक्रम

जागतिक COPD दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये जनजागृती व गृहभेटीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत धूम्रपान करणाऱ्या आणि दम्याचे रुग्ण असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

धूम्रपान सोडणे, लवकर निदान व नियमित उपचार यामुळे COPD रुग्ण उत्तम व आनंदी जीवन जगू शकतो, असा संदेश जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येत आहे.